मुंबई : एसी लोकल सेवांना अल्प प्रतिसाद मिळत असतानाही आता आणखी 34 एसी लोकल फे-यांची भर मध्य रेल्वेवर पडणार आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर एसी लोकलच्या 34 फे-या होतील. तर केवळ दोन विना वातानुकूलित फे-या वाढवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर सध्या चाकरमानींची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गर्दीतून चाकरमानींना दिलासा मिळण्यासाठी लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी कित्येक दिवसांपासून जोर धरीत आहे.
रेल्वेने लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या खऱ्या परंतू 36 पैकी 34 लोकल ट्रेन एसी स्लो आहेत. एसी लोकलला चाकरमानींचा अजिबात प्रतिसाद नाही. तरीही एसी लोकल वाढवण्याचा अट्टाहास का? असा प्रश्न चाकरमानींच्या वतीने विचारला जात आहे.
या निर्णयामुळे मध्य रेल्वेच्या अजब कारभारावर नाराजी व्यक्त होतेय. 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वेबलिंकद्वारे ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा शुभारंभ होणार आहे.
त्यावेळी नव्या एसी लोकल फे-यांनाही हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर सध्या 10 एसी लोकल फे-या होत्या. त्यात आता आणखी 34 फे-यांची भर पडले. त्यामुळे या मार्गावर धावणा-या एसी लोकल फे-यांची संख्या 44 होईल.