Mumbai News : गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुंबईसह महाराष्ट्रात बराच उत्साह पाहायला मिळाला. राज्याच्या विविध भागांमध्ये या दिवसाच्या निमित्तानं अनेक शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे डोंबिवली आणि गिरगावच्या शोभायात्रांची. मराठी नववर्षाच्या निमित्तानं शहराच्या विविध भागांमधून तरुणांसह अबालवृद्धांनीही या शोभायात्रांमध्ये सहभाग घेतला होता. ढोलताशांचा गजर, संस्कृतीचं दर्शन अशा एकंदर वातावरणात या मिरवणुका पार पडत असतानाच गिरगावच्या शोभायात्रेमध्ये मात्र गालबोट लागण्याजोगी घटना घडली.
गिरगावमध्ये मिरवणुकीदरम्यान एका बुलेटनं पेट घेतला. ज्यानंतर स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीनं ही आग विझवली. आग लागल्याचं लक्षात येताच काही काळासाठी घटनास्थळी गोंधळाचं वातावरण आणि बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली. पण, तातडीनं ही आग विझवण्यातही आली.
दरम्यान पाडव्याच्याच दिवशी मुंबईतील वरळी येथे असणाऱ्या गांधीनगरमधील Municipal Industrial Estateमध्ये एका तीन मजली इमारतीत आग लागण्याची घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवीत हानी न झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
वरळीतील या आगीची माहिती मिळताच तातडीनं पालिका प्रशासन, बेस्ट कर्मचारी बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली. यावेळी इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या वीजेच्या तारा आणि तत्सम साहिर्यामुळं आग लागल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.