मुंबई : मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात केवळ सहा टक्के साठा शिल्लक आहे. दरम्यान, मान्सून लांबल्याने चिंता वाढली आहे. आता मुंबई महापालिका राखीव पाणीसाठा वापरणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. त्यासाठी पालिकेने पाणी जपून वापरा, असे आवाहन केले आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांत जुलै अखेरपर्यंत पाणी पुरेल, असा विश्वास महापौर विश्वानाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला आहे.
वायू चक्रीवादळामुळे जूनच्या सुरुवातीला येणारा पाऊस लांबला आहे. पावसाची प्रतिक्षा २१ जूनपर्यंत आहे. हवामान विभागाने मान्सून २१ जूनपासून सुरु होईल, असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, मान्सून कर्नाटकात दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तो २१ पर्यंत येण्याची शक्यता आहे. सध्या काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. मात्र, त्याचा जलायशातील पाणीसाठा वाढीसाठी उपयोग होत नाही. त्यामुळे प्रत्येकाला पाणी जपून वापरावे लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख चार तलाव आहेत. मात्र, या जलाशसाठ्यात केवळ सहा टक्के पाणी आहे. त्यामुळे तुळशी, विहार, मोडकसागर आणि तानसा धरण परिसरात चांगला पाऊस होण्याची गरज आहे. अन्यथा मुंबईकरांवर पाणीसंकट अधिक गढत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मान्सून पुढे सरकत आहे. त्यामुळे पोषक वातावरण असल्याने तो २१ जूनपर्यंत राज्यात सर्वदूर होईल. अपवाद विदर्भ आणि मराठवाड्यातील भाग आहे. त्यामुळे पाणी टंचाईची चिंता मिटण्याची शक्यता आहे.