या तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार निवडणूक - शरद पवार यांची घोषणा

उत्तर प्रदेशातील विधानपरिषदचे माजी आमदार, काँग्रेसचे अल्पसंख्याक समाजाचे नेते सिराज मेहंदी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Updated: Jan 11, 2022, 04:27 PM IST
या तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार निवडणूक - शरद पवार यांची घोषणा title=

मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

मणिपूर विधानसभेत राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. तिथे काँग्रेससोबत निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली आहे. या निवडणुकीत तिथे ५ जागा लढविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.  

गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. जिथे आम्ही लढू इच्छितो त्याची यादी या दोन पक्षांना दिली आहे. तसेच, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीबरोबर निवडणूक लढवत आहोत, असे ते म्हणाले. 

उत्तर प्रदेशात काही जागा लढवण्याची चर्चा झाली आहे. उद्या तिथे समाजवादी पार्टीचा मेळावा आहे त्यात राष्ट्रवादी सहभागी होईल. त्यानंतर जागा वाटपावर चर्चा होईल. उत्तर प्रदेशमधील स्थितीत खूप परिवर्तन दिसत आहे. लवकरच येथे दौरा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. 

जी माहीत आली आहे त्यावरून उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे. लोकांना तिथे बदल हवा आहे. धार्मिक विचार पसरवण्याचे काम सुरू आहे. तेथले मुख्यमंत्री म्हणतात ८० टक्के लोक आमच्याबरोबर आहेत. २० टक्के विरोधात आहे. पण, सगळी जनता मुख्यमंत्र्यांची असते. यांच्या विधानामुळे देशातील अल्पसंख्याक समाजाला असुरक्षितता वाटत आहे, अशी टीका त्यांनी केली. 

यावेळी उत्तर प्रदेशातील विधानपरिषदचे माजी आमदार, काँग्रेसचे अल्पसंख्याक समाजाचे नेते सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.