मुंबई : वादग्रस्त सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणानंतर मुंबई आयुक्त (Mumbai Commissioner) पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेली स्फोटकं आणि सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांची मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली.
शासनाच्या या आदेशाला परमबीर सिंग यांनी या याचिकेत आव्हान दिले आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून केलेली बदली बेकायदेशीर असल्याने रद्द करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून 100 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप केला आहे. आता सर्वोच्च न्यायालयात आरोपानंतर सुनावणी होणार असल्याने काय निर्णय लागतो. तसचे याचिका फेटाळण्यात येईल की राखून ठेवली जाईल, याचीच उत्सुकता आहे.
दरम्यान, सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांच्या वादानंतर अनिल देशमुख हे पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी अनिल देशमुख वर्षावर गेले असतील असेही बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांनी केलेल्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असावी अशीही एक शक्यता आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर ते जास्त अडचणीत आले आहेत. एका कार्यक्रमात मुलाखत देताना अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी चुका केल्याने कारवाई आवश्यक होती, असा आरोप केल्यानंतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला होता.