राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, आणखी ३ दिवस पावसाचा अंदाज

मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..

Updated: Jan 7, 2021, 08:36 PM IST
 राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, आणखी ३ दिवस पावसाचा अंदाज title=

मुंबई : मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होणार आहे. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण आहे. डिसेंबरप्रमाणेच जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच थंडीची तीव्रताही कमी झाली. पुणे शहरातही बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात पाऊस

नाशिकच्या देवळा तालुक्यातल उत्तर भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.  देवळाच्या लोहणेर, विठेवाडी ,भऊर, सावकी ,खामखेडा परिसराला बेमोसमी पावसानं झोडपलं. गहु ,हरभरा पिकाला फटका बसलाय.तर काढणीला आलेला कांदा शेतात भिजलाय. देवळ्यासह सटाणा आणि मनमाड परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

रायगडमध्येही अवकाळी पाऊस

रायगडमध्येही अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. महाड,  पोलादपूर, कर्जत, खालापूर आणि माणगावला जोरदार पावसानं दणका दिलाय. आंबा पिकासह कडधान्यालाही पावसाचा फटका बसलाय. गुरुवारी संध्याकली जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावल. महाड, पोलादपूर तालुकयात मुसळधार पाऊस झाला. यावर्षी रायगडला सातत्यानं अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना दणका दिलाय. 

रत्नागिरीत काही ठिकाणी आंब्याला फटका

रत्नागिरीतल्या लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. दुपारी 2 च्या सुमाराला अचानक पाऊस झाल्यानं, मुंबई - गोवा महामार्गावर एकच धांदल उडाली. कुवे वाकेड घाटात दमदार पावसाच्या सरीनं नागरिकांना झोडपलं. तर रात्री गुहागर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. दिवसभर उष्णता रात्री गारवा अशा वातावरणात पावसानंही हजेरी लावल्यानं आंबा उत्पादक धास्तावलेत.