देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया मुंबई : देशातील किरकोळ महागाई दराने गेल्या आठ वर्षातील उच्चांक गाठला आहे. सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये ६.९५ टक्के असलेल्या महागाईचा एप्रिलमध्ये ७.७९ टक्के इतका भडका उडाला आहे.
पेट्रोल, खाद्यपदार्थ आणि गॅसचे दरही वारंवार वाढत असून त्याचा परिणाम दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचे दरही चढे होण्यात होत आहे. सर्वसामान्यांना जगण्यासाठी आवश्यक त्या वस्तूंचा भडका उडविणारा महागाईचा आलेख सातत्याने वाढत आहे. त्यातच आता सर्वसामान्यांना आणखी एका भाडेवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
वाढती महागाई, सी एन जी चे सातत्याने वाढणारे दर यामुळे रिक्षा टॅक्सी ची भाडेवाढ होणार आहे. गेल्या काही महिन्यापासून सी एन जी चे दर सातत्याने वाढत आहे. याचा आर्थिक बोजा रिक्षा टॅक्सी चालक,मालक यांच्यावर पडत आहे त्यामुळे भाडेवाढीची मागणी केली जातेय. शासनाने नेमलेल्या खटूवा समितीच्या शिफारशी नुसार ही भाडेवाढ होणार आहे. खटूवा समितीची लवकरच बैठक होऊन रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
टॅक्सी चालकांची पाच रुपयाने भाडेवाढ मिळावी अशी मागणी आहे तर तीन रुपयांनी भाडेवाढ मिळावी अशी रिक्षा चालकांची मागणी आहे
रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीसाठी इंधनाचे वाढत जाणारे दर आणि त्यामागे प्रति किलोमीटर येणारा खर्च, वाहनाचा देखभाल दुरुस्ती खर्च, नवीन रिक्षा आणि टॅक्सीची किंमत, वार्षिक घसारा, वार्षिक विमा, प्रति वर्ष मोटर वाहन कर, वार्षिक लायसन्स नूतनीकरण शुल्क, प्रति वर्ष परवाना नूतनीकरण शुल्क, उपजीविकेचा वार्षिक खर्च लक्षात घेऊन भाडेसूत्रानुसार दर निश्चित केले जातात.
LPG गॅस दरात पुन्हा वाढ
घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 3 रुपये 50 पैशांनी वाढ झाली आहे. त्यानंतर देशात घरगुती एलपीजी सिलिंडरचा आकडा 1000 च्या पुढे गेला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईमध्ये 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये, चेन्नईमध्ये 1018.5 रुपये झाली आहे.