'CCTV मध्ये दिसणारा तो मी नव्हेच', वकिलांनी पोलिसांचा तपास आणि सैफवरच उपस्थित केले प्रश्न!

Saif Ali Khan Attacked: आरोपीच्या वकिलांनी मुंबई पोलिसांचा तपास आणि सैफच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहे.  

Pravin Dabholkar | Updated: Jan 24, 2025, 01:25 PM IST
'CCTV मध्ये दिसणारा तो मी नव्हेच', वकिलांनी पोलिसांचा तपास आणि सैफवरच उपस्थित केले प्रश्न! title=
आरोपीचे वकील

Saif Ali Khan Attacked: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वीच मुंबईतील त्याच्या राहत्या घरी चाकूनं हल्ला करण्यात आला होता. या घटनेतील आरोपीला पकडण्यात आले असून हा तो सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पण आता या कहाणीत मोठा ट्वीस्ट आलाय. सीसीटीव्हीत दिसणारा तो मी नव्हेच, असे आरोपीचे म्हणणे आहे. आरोपीच्या वकिलांनी कोर्टात आपली बाजू मांडली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

सैफवर हल्ला करत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. प्राथमिक माहितीनुसार ही घटना चोरीच्या हेतूनं झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर लगेचच तपासाची सूत्र हलली. दरम्यान आरोपीच्या वकिलांनी मुंबई पोलिसांचा तपास आणि सैफच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहे.  

कोणतीही नोटीस न  देता आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला आहे.   हल्ला झाल्यावर सैफनं वकिलांना का कळवलं नाही? सुरक्षा रक्षकाला का फोन केला नाही? असा प्रश्न आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केलाय. 

आरोपी घाबरलेल्या अवस्थेत, हल्ल्यानंतर दीड तासाने सैफ रुग्णालयात गेला. हल्ल्यानंतर सैफ अली खानने पोलिसांशी संपर्क का साधला नाही? आरोपीविरोधात पोलिसांनी अद्याप यंत्रणांनी ठोस पुरावा दिलेला नाही. सीसीटीव्हीतील आरोपी आणि अटकेतील आरोपीत साम्य नाही. सहाव्या मजल्यावर सीसीटीव्ही इतर कुठेही सीसीटीव्ही नाही, असेही आरोपीच्या पोलिसांनी म्हटले आहे.

'साम्य नसून बराच फरक आढळत असल्याची बाब'

सैफवर हल्ला करणारा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरीही ही व्यक्ती आणि पहिल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी व्यक्ती यांच्या चेहऱ्यांमध्ये काहीच साम्य नसल्याचा सूर अनेकांनीच आळवला. ज्याला दुजोरा देणारं एक वृत्त नुकतच समोर आलं आहे. सोशल मीडियावर पोलीस अटकेत असणारा मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आणि सीसीटीव्हीतील इसम यांच्या चेहऱ्यांमध्ये साम्य नसल्याच्या चर्चा सुरू असतानाच दैनिक भास्करनं फॉरेन्सिक एक्सपर्टची मदत घेत आणखी एक धक्कादायक दावा केला. ब्रिलियंट फोरेंसिक इन्वेस्टिगेशन प्राइवेट लिमिटेडचा हवाला देत माध्यम समूहानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अटकेतील आरोपी आणि सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यांची पडताळ  करण्यात आली. ज्यामध्ये फोटो रेकग्नेशननुसार दोन्ही चेहऱ्यांमध्ये साम्य नसून बराच फरक आढळत असल्याची बाब समोर आली. पडताळणीतून समोर आलेल्या माहितीनुसार शरीफुलचं कपाळ रुंद असून, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा काहीसा लांबट आणि रुंदीला कमी दिसत आहे. अटकेतील आरोपीचे डोळेही फुटेजमधील व्यक्तीशी जुळत नाहीयेत. इतकंच नव्हे, तर या दोन्ही फोटोंमध्ये भुवया पाहिल्या असता शरीफुलच्या भुवयांमध्ये कमी अंतर असून, दुसऱ्या व्यक्तीच्या भुवया एकमेकांपासून जास्त दूर असून, ओठ आणि नाकाच्या ठेवणीमध्येही बराच फरक आढळल्यानं अटक करण्यात आलेला आरोपी आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी यांमध्ये तफावत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, यावर यंत्रणेकडून कोणताही अधिकृत खुलासा किंवा उलगडा करण्यात आलेला नाही याची नोंद घ्यावी.