आमदारकीचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश

शहापूरमध्ये शिवसेनेला अच्छे दिन येणार...

Updated: Jul 11, 2019, 08:52 AM IST
आमदारकीचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे बरोरा यांचा शिवसेनेत प्रवेश title=

मुंबई : शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला होता. राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बरोरा यांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूरमध्ये शिवसेनेला अच्छे दिन येणार आहेत. पांडुरंग बरोरा यांनी पंचायत समिती सदस्य तसेच शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. 

बरोरा यांच्या पक्ष प्रवेशाच्यावेळी महत्वाची भूमिका बजावणारे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय शिरसाट, अमित घोडा, शांताराम मोरे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख धिर्डे आदी उपस्थित होते.

आपल्या मतदार संघात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासकामांसाठी जास्त निधी दिला आहे. त्यामुळे मी जनतेची कामे करु शकलो, अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवेशानंतर बरोरा यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बरोरा हे  कोणत्याही प्रलोभनापोटी नव्हे तर शिवसेनेवरील विश्वास आणि प्रेमापोटीआले आहेत. त्यांनी मांडलेले शहापूरमधील जनतेचे प्रश्न शिवसेना सोडवेल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

दरम्यान, पांडुरंग बरोरा यांच्याबरोबरच पालघरमधील पालघरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे, तेथील नगराध्यक्षा उज्ज्वला काळे तसेच अन्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.  या सर्वांचे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत स्वागत केले. दरम्यान, युवक काँग्रेसचे प्रवक्ते आनंद दुबे यांनीही काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.