MLA Aaditya Thackeray: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची 'महा निष्ठा, महा न्याय' यात्रा नुकतीच लालबागमध्ये पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमधून सगळे भाजपमध्ये जातायत. आता राहुल गांधी यांनीदेखील भाजपमध्ये जावे. असे केल्यास ते पंतप्रधान होतील. कारण भाजपमध्ये सगळे काँग्रेसचे नेते आहेत, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी केले.
आता अच्छे दिन ही भाजपची टॅग लाइन राहिली नाही. 'डाग अच्छे है! वॉशिंग पावडर भाजपा' अशी टॅगलाईन झाल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपच्या प्रोजेक्ट पळवण्याच्या धोरणामुळे नुकसान महाराष्ट्रचा नाही देशाचे झाले आहे. वेदांता फोकस्कॉन उद्योग देशातून बाहेर गेला, असे ते म्हणाले.
मोबाइल बनविण्यासाठी सेमिकण्डक्टर गरजेचं असताना, मोबाइल लॅपटॉप मधली छोटी चिप बनविण्याचे काम देशात होणार होतं. आता ही संधी कधी येणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुंबईच्या रक्ता रक्तात क्रिकेट आहे. फायनल मुंबईमध्ये झाली असती तर वर्ल्डकप फायनल आपण आपल्या मातीत जिंकलो असतो. तरुणांना रोजगार मिळत नाहीये. त्यांचा स्वप्न हे सरकार चिरडत असल्याचे ते म्हणाले.
सरकारी नोकर भरतीवरदेखील आदित्य ठाकरेंनी यावेळी निशाणा साधला. तलाठी भरतीत 200 पैकी 214 मार्क...हे पाहून मी म्हणालो की तुम्ही एव्हीएम मध्ये पेपर देत होतात का? असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.
20 तारखेला अधिवेशन घेत आहात. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवत आहात तर नोकरी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये पेपर फुटीवरसुद्धा कडक कायदा आणा, असे आवाहन ठाकरेंनी केले. पेपरफुटी झाली तर पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा करा, असा कडक कायदा करा, असेही ते म्हणाले.
आमचा सरकार आलं तर पेपरफुटीवर कडक कायदा आणू, जो पेपर फोडेल त्याला आमचं सरकार त्याला फोडेल, असेही ते म्हणाले.
या सरकार मध्ये महिला मंत्री नव्हती. या सरकारमधील मंत्री महिला नेत्याला टीव्ही वर शिव्या घालतात. महिलांचा अपमान करतात तरी सुद्धा त्याला हाकलून लावले जात नाही. आपले सरकार असताना एक मंत्र्यावर आरोप झाले आपण त्याचा राजीनामा घेतला. उद्धव ठाकरे बोलले अशी घाणेरडी माणसं माझ्या मंत्रिमंडळात नको, याची आठवण आदित्य ठाकरेंनी करुन दिली.
हे केंद्र सरकार महिला, शेतकरी, तरुणाचं वाटतं का? हे सरकार भाजपचे तरी वाटतं का? राज्यातील 5 भाजपचे मुख्य नेते सांगा. प्रमुख 5 नेते जे शिव्या देतात आपल्याला त्यांनी भाजपमध्ये कधी प्रवेश केला? जे खरे प्रमुख नेते भाजपमध्ये होते ते आता कुठे गेले? असे प्रश्न त्यांनी जनतेला विचारले.
बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचा मुख्यमंत्री आपण आता बसवला आहे. 10 गद्दार मंत्री मिंदेचे आहेत, 9 राष्ट्रवादीचे गद्दार मंत्री, 6 भाजपचे मंत्री, 4 भाजपचे मंत्री ते बाहेरून आलेले. या सर्वात भाजपला मिळालं काय? असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार फंड देत नाहीत म्हणत होतात. त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री केलंत असा टोलाही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला.