Uddhav Thackeray: धारावी प्रकल्पात स्थानिकांना न्याय मिळावा यामागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोर्चा काढला. हा मोर्चा आत्ताच का काढला गेला? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित करत हा सेटलमेंट मोर्चा असल्याची टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. या टिकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आरक्षण, धारावी प्रश्न अशा विविध प्रश्नांवरुन विरोधकांवर निशाणा साधला. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार मराठ्यांना पाठींबा देत असेल तर मी या निर्णयासोबत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरेंनी केलेल्या टिकेवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. आंदोलन झाल्यानंतर विषय काय? असे काहीजण विचारत होते, विराट मोर्चा होऊनदेखील ज्याला याबद्दल विचाराव लागतंय त्यांच्याबद्दल काय बोलायचं? असे ते म्हणाले. पण आम्ही धारावीत मोर्चा काढल्यानंतर अदानीचे चमचे कोण आहेत? हे मला आता कळायला लागलंय असे उद्धव ठाकरे ठाकरे म्हणाले.
धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. धारावी प्रकल्पासाठी टेंडर काढावं की सरकराच्या माध्यमातून करावा या द्विधा मनस्थितीत आम्ही मविआ सरकार होतो. पण तेवढ्यात भाजपने सरकार पाडलं. आमचे सरकार का पाडले? असा प्रश्न ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला.
दरम्यान त्यांना शालीचे वजन पेलतंय का हे त्यांनी पाहावं? असा टोला उद्धव ठाकरे यांनी आपले बंधू राज ठाकरेंना लगावला.
या मोर्चाला धारावीची लोक नव्हती, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. या टिकेला त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. मोदींनी चांद्रयानच्या माध्यमातून वाहतूक सुरु केली आहे. त्यामुळे धारावीची नव्हे तर आम्ही चंद्रावरुन माणसं आणली होती. ती माणसे मुंबईकरांचे प्रश्न मांडत होती, असे ते म्हणाले.