मुंबई : मंगळूरू येथील पिलिकुला प्राणिसंग्रहालायतून दोन बिबट्यांना भायखळ्याच्या राणीबागेत आणण्यात आले आहे. ड्रोगन असे नर बिबट्याचे नाव असून त्याचे वय २ वर्षे आहे. तर, मादी बिबट्याचे नाव पिंटो असे असून तिचे वय ३ वर्षे आहे. दोन्ही बिबट्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांना काही दिवस वाट पहावी लागेल. दोन महिन्यानंतर, या बिबट्याचं दर्शन मुंबईकरांना होणार आहे.
‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ (राणीचा बाग) पेंग्विनच्या आगमनानंतर पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. पेंग्विनच्या अगमनाने दिवसाला सरासरी १० हजार पर्यटक राणीबागेला भेट देतात. त्यामुळे आकारल्या जाणार्या प्रवेश शुल्कातून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गेल्या दोन वर्षांतच १५ कोटींचा महसूल शुल्कात वसूल झाला आहे.
पेंग्विननंतर आता ड्रोगन बिबट्यांना पाहण्यासाठी पर्यटक आणि बच्चे कंपनी किती गर्दी करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.