ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई : संसार म्हटला की भांड्याला भांड लागतंच... मग काही जणांच्या बाबतीत हे भांडण पार घटस्फोटापर्यंत जाऊन कोर्टाची पायरी चढली जाते. पण असं काही घडलंय की कोर्टात घटस्फोटासाठी गेलेली जोडपी आता पुन्हा लग्न करणार आहेत.
खूष रंग बहारा.... हे आता बऱ्याचशा जोडप्यांना कळून चुकलं आहे. मुंबईत अनेक जोडपी घटस्फोट घ्यायला कोर्टात गेली होती, पण त्यांना एक दुजे के वासते आपणच आहोत, हे पटलं आहे. म्हणूनच २२१ जोडप्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला आणि पुन्हा संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. हे शक्य झालं आहे समुपदेशनामुळे.
गेल्या वर्षभरात मुंबईत कुटुंब न्यायालयाकडे 6373 प्रकरणं आली. यापैकी 221 जोडप्यांनी पुन्हा संसार सुरू केला तर 2878 जोडप्यांनी घटस्फोट घेतला. जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा, आर्थिक बाबी, वयातलं अंतर अशा अनेक कारणांमुळे ही जोडपी घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत गेली होती. पण त्यांनी पुन्हा एकत्रच राहायचं ठरवलं.
घटस्फोटासाठी कोर्टाची पायरी चढली की समुपदेशन हा शेवटचा पर्याय असतो... पण समुपदेशन आधीही मिळू शकतं. दोघांमध्ये काहीतरी खुटपूटू लागलंय, असं वाटलं की समुपदेशकाकडे आधीच जा, असा सल्ला दिला जात आहे. घटस्फोटांचं प्रमाण गेल्या काही काळात वाढलंय, हे खरंय. पण जोडपी अशी पुन्हा एकमेकांबरोबरच नांदू लागली, हे एकदम मस्तच झालं.