विधानपरिषद उपसभापती निवडणूक : भाजपची खेळी, उमेदवार रिंगणात उतरवला

मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे. 

Updated: Sep 7, 2020, 04:24 PM IST
विधानपरिषद उपसभापती निवडणूक : भाजपची खेळी, उमेदवार रिंगणात उतरवला title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मंगळवारी होणाऱ्या विधानपरिषद उपसभापती निवडणुकीची रंगत भाजपने वाढवली आहे. भाजपने या निवडणुकीत भाई गिरकर यांना उमेदवारी दिली आहे. भाई गिरकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. विधानपरिषदेतल्या आपल्या सर्व आमदारांना भाजपने मुंबईमध्ये बोलावलं आहे. काही आमदार हे आज अनुपस्थित होते. तर भाजपच्या दोन आमदारांना कोरोना झाल्यामुळे त्यांना ऑनलाईन मतदान करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भाजप सभापतींना करणार आहे.

दुसरीकडे या निवडणुकीत दुसरे उमेदवार शिक्षक आमदार कपिल पाटील यांना भाजप पाठिंबा देणार असल्याचीही चर्चा होती, पण भाजपने स्वत:चाच उमेदवार रिंगणात उतरवला. मतविभागणी करत उपसभापती निवडणुकीत विजयासाठी भाजपचा प्रयत्न आहे. 

विधानपरिषदेतील पक्षनिहाय संख्याबळ

शिवसेना- १४

राष्ट्रवादी काँग्रेस- ९

काँग्रेस- ८

महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांचं संख्याबळ ३१ होतंय.

भाजप- २२

शेकाप- १

रासप- १ 

लोकभारती- १ 

अपक्ष- ४ 

भाजपचे आणि इतर पक्षांचे मिळून संख्याबळ २९ होत आहे.