कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, तुलसी, मोडकसागरपाठोपाठ विहार तलावही भरून वाहू लागला आहे. बुधवारी रात्री ९ वाजून ४२ मिनिटांनी हा तलाव भरला. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्या तलावांत सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तलावांतील पाणीसाठा वाढला आहे. बुधवारी ३१ जुलै पर्यंत १२४०१२२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा पुढील ११ महिने म्हणजेच जून २०२० अखेरपर्यंत पुरणारा आहे.
जुलैमधील जोरदार पावसामुळे ३१ जुलैच्या पाणीसाठ्याने सरासरीही ओलांडली आहे. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी ८३.३० टक्के पाणी होते, मात्र यावर्षी ८५.६८ टक्के पाणी जमा झाले आहे.
यंदा तलावांनी तळ गाठला असताना जूनही कोरडा गेल्यामुळे पाण्याची चिंता वाढली होती. मात्र जुलैमध्ये तलावक्षेत्रात दमदार पाऊस पडल्याने जूनची कसर भरून निघाली आहे. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो.
यामध्ये पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यानुसार मुंबईकरांना होणार्या पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाते. यामध्ये सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी १४४७३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते.
मात्र, गेल्यावर्षी १ ऑक्टोबर २०१८ रोजी तब्बल २ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी होता. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यातून पावसाळ्यापर्यंत पुरेशा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी पालिकेने नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणी कपात सुरू केली होती.
परंतु, जुलैमध्ये तलावक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे समाधानकारक पाणीसाठा जमा झाल्यामुळे २० जुलैपासून १० टक्के असलेली पाणीकपात प्रशासनाने मागे घेतली आहे.
२४ जुलैचा पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
तलाव पाणीसाठा टक्केवारी
अप्पर वैतरणा १४२२५३ ६२.६५
मोडक सागर १२८९२५ १००
तानसा १४४००५ ९९.२६
मध्य वैतरणा १८०५८६ ९३.३१
भातसा ६०८९५८ ८४.९३
विहार २७५९८ १००
तुळशी ८०४६ १००
एकूण १२४०१२२ ८५.६८
दोन दिवसांत एक महिन्याचे पाणी जमा
तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून २९ व ३० जुलै रोजी झालेल्या पावसामुळं ११००३२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईकरांना दररोज होणार्या ३६५० दशलक्ष लिटर पाणी लक्षात घेता २४ तासांत तब्बल एका महिन्याचा पाणीसाठा जमा झाला आहे.
तलावांची स्थिती
* तुळशी तलाव १२ जुलै रोजी भरून वाहू लागला
* तानसा तलाव २५ जुलै रोजी भरून वाहू लागला
* मोडकसागर २६ जुलै रोजी भरून वाहू लागला
* मध्य वैतरणा काठोकाठ भरल्याने २७ जुलैला दरवाजे उघडले
* भातसा तलावाचे दरवाजे २९ जुलै रोजी उघडण्यात आले
* विहार तलाव ३१ जुलै रोजी भरून वाहू लागला