आम्ही अमित शहांनाही शपथविधीचे आमंत्रण देऊ- संजय राऊत

येत्या १ डिसेंबरला शिवतीर्थावर ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

Updated: Nov 26, 2019, 10:10 PM IST
आम्ही अमित शहांनाही शपथविधीचे आमंत्रण देऊ- संजय राऊत title=

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी आम्ही अमित शहा यांनाही आमंत्रण देऊ, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची एकमताने मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. येत्या १ डिसेंबरला शिवतीर्थावर ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. 
 
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी संजय राऊत यांना शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी बोलावणार का, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, होय, आम्ही सर्वांना बोलावणार आहोत. अमित शाहांनाही निमंत्रण दिलं जाईल, असे राऊत यांनी म्हटले. 

अबकी बार 'ठाकरे सरकार'; महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची निवड
 
 देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज संध्याकाळी ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची बैठक पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंती पाटील यांनी महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमताने मंजूर केला. यानंतर सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला.

काकांची भेट घेण्यासाठी अजित पवार 'सिल्व्हर ओक'वर दाखल

 आतापर्यंत ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने राजकीय पद स्वीकारले नव्हते. त्यांच्याकडून केवळ रिमोट कंट्रोलने सत्तेची सूत्र हलवली जात असत. मात्र, आदित्य ठाकरे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराणे पहिल्यांदाच प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे.