www.24taas.com, बंगळूरू
जगदीश शेट्टर यांनी आज गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या चार वर्षांतील शेट्टर हे तिसरे भाजपचे नेते आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून के. एस. ईश्वरप्पा आणि आर. अशोक यांनीही आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राजभवन येथे कर्नाटकचे राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी शेट्टर यांना शपथ दिली. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी राजीनामा दिल्यानंतर शेट्टर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. येडियुरप्पांवर खाण घोटाळ्याचे आरोप लागल्यानंतर त्यांना हे पद सोडावे लागले आणि त्यांच्या जागी सदानंद गौडा यांची नियुक्ती करण्यात आली होती.
गौडा यांना हटविण्यासाठी येडियुरप्पा यांनी भाजप नेत्यांवर दबाव आणल्यानंतर अखेर गौडा यांना हटविण्यात आले आणि येडियुरप्पांचे समर्थक असलेल्या शेट्टर यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. शेट्टर हे हुबळी ग्रामीण मतदारसंघातून चारवेळा निवडून आले आहेत. शेट्टर यांच्यासह बसवराज बोम्मई, सी. एस. उड्डासी, सुरेश कुमार, एस. ए. रवींद्रनाथ, विश्वेशर कागेरी, गोविंद कजरोल आणि उमेश कट्टी यांच्यासह ३२ मंत्र्यांनी शपथ घेतली.