www.24taas.com, नवी दिल्ली
अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हजर राहणार आहेत त्यामुळं नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. बादल एनडीएमध्ये आहेत. तसंच पंजाबमध्ये अकाली दल-भाजप युतीचं सरकार आहे.
अशावेळी शरद पवार शपथविधीला जाणार असल्यानं नव्या राजकीय फेरमांडणीची चर्चा सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशात मुलायमसिंह यादव यांनी मोठा विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या फेरमांडणीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. तिसऱ्या आघाडीतल्या बहुतांश नेत्यांचे पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळं अशावेळी विरोधी पक्षाचं सरकार असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला पवारांनी जाणं ही घटना राजकीय क्षेत्रात वेगळी मानली जाते आहे.
मुलायमसिंह यादव यांच्या शपथविधीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जाणार होत्या. मात्र काँग्रेसनं आक्षेप घेतल्यानं तृणमुल काँग्रेसला आपला बेत बदलावा लागला. आता पवारांच्या या कृतीवर काँग्रेसमधून काय प्रतिक्रिया येणार ते पाहणं औत्सुक्याचं आहे.