www.24taas.com, लखनऊ
भ्रष्टाचार मुद्दावर आंदोलन करणारे आणि त्यासाठी देशात मतदारांमध्ये जनजागृती करणारे 'टीम अण्णां'मधील सदस्य अरविंद केजरीवाल यांनी मतदान केलंच नाही. ज्यावेळी केजरीवाल मतदान करायला मतदान केंद्रावर गेल्याने त्यांचं मतदार यादीत नाव नसल्याचे पुढे आले. त्यामुळे पुन्हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला.
लोकपालच्या लढ्यासाठी अण्णांसोबत सक्रिय असलेले अण्णांचे सहकारी अरविंद केजरीवाल मतदानाबद्दल किती जागृत आहेत याचा प्रत्यय आज आला. गोव्यात जाण्यासाठी केजरीवाल आज सकाळी ७ वाजताच घरातून बाहेर पडले. खरतर दिल्ली एअरपोर्टवरून गोव्याला जाणा-या विमानाची वेळ सकाळी साडेदहा वाजताची होती. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे...आणि मतदान न करताच मतदार जागृतीच्या कार्यक्रमासाठी केजरीवाल निघाले. ही बातमी कळताच मीडियानं त्यांना चांगलच कोंडीत पकडलहोतं. हे प्रकरण आपल्या अंगलट येणार असे दिसताच त्यांनी सावध पवित्रा घेतला.
मीडियाच्या कात्रीत सापडलेले केजरीवाल यांनी तडक गाझियाबाद येथे मतदान केंद्रावर धाव घेतली. मात्र मतदार यादीत आपलं नावच नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मतदान न करताच केजरीवाल यांना परतावं लागले. त्यानंतर ते पुन्हा गोव्याकडे रवाना झाले. दरम्यान, आपल्याकडून ही चूक झाली आहे. याचे मला दु:ख वाटत आहे, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.