www.24taas.com, भुवनेश्वर
ओडिशातील गंजम जिल्ह्यातून अपहरण माओवाद्यांनी इटलीच्या दोन पर्यटकांचे अपहरण केले आहे. त्यामुळे याचा पर्यटकांनी धसका घेतला आहे. दरम्यान, या इटालियन पर्यटकांची मानवतावादी दृष्टिकोनातून सुटका करावी, असे आवाहन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी केले आहे. कायदा पाळून कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यास आपली तयारी असल्याचेही ते म्हणाले.
आदिवासीबहुल कंधमाल आणि गंजम जिल्ह्यांच्या हद्दीवरील परिसरात माओवाद्यांनी बॉसुस्क पाओलो व क्लौडो कॉलान्जेलो या इटालियन पर्यटकांचे अपहरण केल्याची माहिती पोलिस महासंचालक मनमोहन प्रहाराज यांनी दिली. ही घटना शनिवारी रात्रीच घडल्याचे गृह सचिव यू. एन. बेहेरा यांनी सांगितले. काल मध्यरात्रीच्याच सुमारास या अपहरणाची जबाबदारी माओवाद्यांनी एका खासगी दूरचित्रवाणीशी बोलताना स्वीकारल्याचे सूत्रांनी सांगितले.
पर्यटकांचे अपहपण करतांना माओवाद्यांनी तेरा मुद्द्यांचे मागणीपत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितले. नक्षलवादविरोधी कारवाया थांबवाव्यात, माओवादी असल्याच्या कारणावरून आदिवासींविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारी मागे घ्याव्यात आदी त्यांच्या मागण्या आहेत. पाओलो आणि कॉलान्जेलो या दोघांना जंगल परिसरात जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली होती; परंतु ते गिर्यारोहणासाठी तेथे गेले. त्या वेळी माओवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. त्यांच्यासोबत वाहनचालक , एक आचारीही होता; त्यांना माओवाद्यांनी सोडून दिले, असे मुख्य सचिव बी. के. पटनाईक यांनी सांगितले.