कपिल राऊत, www.24taas.com, ठाणे
महापालिका निवडणुकीत कुणी मुलाला तिकीट दिलंय, कुणी पत्नीला, कुणी भावाला किंवा अन्य कुठल्या नातेवाईकाला. ठाण्यात मात्र एकाच घरात कुठे दोन तर कुठे तीन जणांना तिकीट मिळालं आहे.
देवराम भोईर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. चार टर्म ते नगरसेवक आहेत. आता पाचव्यांदा ते नशीब अजमावणार आहेत. भोईरांचा मुलगा संजय भोईरही विद्यमान नगरसेवक आहेत. दोन टर्म त्यांनीही नगरसेवकपद भूषवलं आहे.तिसऱ्यांदा तेही रिंगणात उतरणार आहेत. यावेळी भोईर बापलेकांसोबत देवराम भोईर यांनी सुनबाईंनाही रिंगणात उतरवायचं ठरवलं आहे. घरातच तीन तिकीटं दिली असली तरी भोईर कुटुंबियांना यात वावगं काहीच वाटत नाही. लोकांच्या आग्रहास्तव सुनेला तिकीट दिल्याचं ते सांगतात.
दुसरीकडं काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक प्रभाग क्रमांक ३४ मधून नशीब अजमावत आहेत. गेली तीन टर्म ते नगरसेवक आहेत. यावेळी ते रिंगणात आहेतच शिवाय त्यांच्याच प्रभागातून पत्नीलाही रिंगणात उतरवणार आहेत. शिवसेनेला हरवण्यासाठी आणि लोकांच्या आग्रहास्तव पती-पत्नी निवडणूक लढवत असल्यांच फाटक सांगतात.
काही घरातच सगळी तिकीटं दिल्यानंतर आता कार्यकर्ते किती जोमानं काम करतात आणि यापैकी किती जण निवडणून येतात हे निकालानंतर स्पष्ट होईलच, मात्र या घराणेशाहीमुळं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची कुचंबणा होत आहे हे मात्र नक्की.