परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवले

अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील परतीच्या पावसानं भात शेतीला मोठा फटका दिला आहे. पावसामुळे 30 हजार हेक्टर पैकी 20 ते 25 हेक्टर भातशेतीचं नुकसानं झालं आहे.

Updated: Oct 18, 2011, 03:20 PM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे

 

अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील परतीच्या पावसानं भात शेतीला मोठा फटका दिला आहे. पावसामुळे 30 हजार हेक्टर पैकी 20 ते 25 हेक्टर भातशेतीचं नुकसानं झालं आहे. सरकारी अधिका-यांनी मात्र याकडे दुर्लक्षच केलं. त्यामुळे शेतक-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तिनही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

 

यावर्षी पाऊस चांगला झाल्यानं भाताचं पीकही चांगलं आलं होतं. मात्र गेले आठ दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसानं शेतातील उभं पीक आडवे झालं आहे. कापून ठेवलेलं पीकही पाण्यामुळे खराब झाल्यानं जनावरांसाठी पेंढ्याचा प्रश्न निर्माण झालाय. या नुकसानीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय. विशेष म्हणजे 20 ते 25 हजार हेक्टर क्षेत्रातील भातपीकाचं नुकसान होऊनही एकही सरकारी अधिकारी शेतक-यांकडे फिरकलेला नाही.