दुष्काळात नेत्यांचा भार...

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळाचं दुष्टचक्र सुरूच आहे. आणि त्यातच इथले लोकप्रतिनिधीही स्वत:चीच तुमडी भरत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे लोकप्रतिनिधी तुपाशी आणि गावकरी मात्र उपाशी असं म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

Updated: Jun 3, 2012, 01:19 PM IST

 www.24taas.com, सोलापूर 

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळाचं दुष्टचक्र सुरूच आहे. आणि त्यातच इथले लोकप्रतिनिधीही स्वत:चीच तुमडी भरत असल्याचं उघड झालंय. त्यामुळे लोकप्रतिनिधी तुपाशी आणि गावकरी मात्र उपाशी असं म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातलं पोखरापूर गाव... पाण्याचं नेहमीच दुर्भिक्ष... गावात दोन दिवसाआड फक्त पंधरा मिनिटं पाणी येतं. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी सतत वणवण फिरावं लागतं. मात्र, गावच्या सरपंचांना गावकऱ्यांच्या या त्रासाचं काहीच सोयरसूतक नसल्याचं दिसून येतंय. एकीकडे गाव पाण्यासाठी तरसत असताना दुसरीकडे गावच्या सरपंच आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचं उघड झालंय. सरपंच ग्रामपंचायतीची मोटर आणि आकडा टाकून वीज घेऊन चक्क पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीतील पाणी आपल्या शेतातील उसाला देत असल्याचं उघड झालंय. त्यामुळेच दुष्कालाबरोबरच या फुकट्या नेत्यांचाही भार जनतेलाच वाहायला लागतोय.

गावकऱ्यांनीच सरपंचांचा हा प्रकार उघड करून गटविकास अधिकारी मोहोळ यांच्याकडे तक्रार दिली. तक्रारीवरून विस्तार अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विहिरीला भेट देऊन सर्व प्रकाराचा पंचनामाही केलाय. पण, यानंतर या दोषी लोकप्रतिनिधीवर कारवाई होणार काय? याकडेच सगळ्या गावकऱ्यांचं लक्ष लागलंय.

.