www.24taas.com, नवी दिल्ली
सिक्सर किंग युवराज सिंग त्याच्या चाहत्यांना टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळतांना पाहता येण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संभाव्य 30 प्लेअर्सची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता असून यामध्ये युवीची निवड जवळपास निश्चित मानली जाते आहे. गेल्या वर्षभरापासून युवी कॅन्सरशी झुंज देत होता. कॅन्सरविरूद्धचं युध्द युवीनं जिद्द आणि चिकाटीनं जिंकल. आता या आघातानंतर युवराजला वेध लागले आहेत ते टी-20 वर्ल्ड कपचे...सप्टेंबरमध्ये होणा-या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळण्याची तीव्र इच्छा युवराजनं एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. टी-20 वर्ल्डकपसाठी सज्ज होण्यासाठी युवीने बंगळुरूमध्ये प्रक्टीसला सुरूवातही केलीय.
यामुळे तो लवकरच टीम इंडियात दाखल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. लंकेत होणा-या टी-20 वर्ल्ड कपसाठी बधुवारी संभाव्य 30 प्लेअर्सची यादी जाहीर केली जाणार आहे. या संभाव्य टीममध्ये युवीचे नाव असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान 75 टक्के फिट होऊन टीममध्ये परतण्याला काहीही अर्थ नाही. मग पुन्हा विश्रांती घ्यावी लागेल म्हणूनच शंभर टक्के फिट झाल्यावरच टीममध्ये आपण परतू असं युवीने स्पष्ट केलय. मात्र बंगळुरूमध्ये युवीने ईशांत शर्माला खणखणीत सिक्सर्स लगावत आपला फिटनेस आणि फॉर्मचा दाखला दिला होता. यामुळेच यावर्षी होणा-या टी-20 वर्ल्ड कपसाठी त्याची निवड होईल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.
युवी हा खरा मॅच विनर आहे आणि त्याने ते अनेकदा सिध्दही करून दाखवलय. 2003मध्ये युवराजने बॅटिंग आणि फिल्डिंगमध्ये जबरदस्त कामगिरी करत टीम इंडियाला फायनलचे दरवाचे उघडे करून दिले होते. 2007 टी-20 वर्ल्ड कपमध्ये युवीने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सलग सिक्स लगावत सिक्सर किंगची उपाधी प्राप्त केली. यानंतर 28 वर्षांनंतर भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यातही युवीचा मोलाचा वाट राहिलाय. म्हणूनच हा मॅच विनर श्रीलंकेत होणा-या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावा अशी इच्छा भारतीय क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. आता भारतीय टीमचा हा योध्दा कधी मैदानात उरेल याचीचं उत्सुकता सगळ्यांना लागलीय. पुन्हा एकदा टी-20 मध्ये युवीचा धमाका पाहायला मिळावा याचीच वाट प्रत्येक जण आतूरतेनं बघतोय...