www.24taas.com, हैदाराबाद
हैदराबाद स्फोटांना १६ तास उलटून गेल्यानंतर आता अनेक आघाड्यांवर याचा तपास सुरू आहे. एकीकडे फोरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळावर काही धागेदोरे हाती लागतायत का? याचा शोध घेतायत तर दुसरीकडे गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्यात.
पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरील स्फोटांशी याचं साधर्म्य असल्यानं संशयाची सुई पुन्हा इंडियन मुजाहिद्दीनवर रोखली गेलीये. स्फोटांसाठी अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. घटनास्थळी लोखंडी खिळे आणि टोकदार धातुचे तुकडे सापडले असून स्थानिक तपास अधिकाऱ्यांनी या स्फोटासाठी आरडीएक्सच्या वापराची शक्यता नाकारलीय. हैदराबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर तपास कामात वेग आलाय. स्फोटाचा करण्यासाठी घटनास्थळी एनआयए, मुंबई एटीएस आणि आंध्र पोलिसांची टीम दाखल झालीय. या सर्व टीम्सकडून घटनास्थळाची कसून चाचपणी होतीय.
दरम्यान, हैदराबाद स्फोटातल्या मृतांची संख्या १४ वर पोहोचलीये. तर ११९ जण यात जखमी झाले असून यातले ६ जण गंभीर आहेत. मृतांच्या नातलगांना आंध्र सरकारनं सहा लाख तर केंद्र सरकारनं दोन लाखांची मदत केलीय. गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली.