www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच होते... ते आपल्यात नाहीत ही कल्पनासुद्धा करवत नाही, असं म्हणत छगन भुजबळ भावूक झाले. ते ‘झी २४ तास’शी बोलत होते.
‘बाळासाहेबांचं निश्चितच माझ्यावर प्रेम केलं. मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आम्ही एकमेकांपासून दूर झाल्यानंतरही त्यांनी आमच्यावर कडाक्यानं लक्ष ठेवलं. व्यक्तिगत पातळीवर आमचे संबंध होते. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मी अनेकवेळा बाळासाहेबांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला... पण, ज्यावेळी मी त्यांना भेटायला गेलो त्यांच्या बोलण्यात कटूतेचा लवलेशही नव्हता’ असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ भूतकाळात हरवले.
‘बाळासाहेब ठाकरे माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच होते. त्यांचा आशिर्वाद हा आमच्या घरातही वडिलांसारखाच मानला जायचा. त्यांच्यारूपानं एक ठाम व्यक्तिमत्त्वच महाराष्ट्राला मिळालं होतं... आणि आज ते आपल्यात नाहीत ही कल्पनासुद्धा करवत नाही, असं म्हणत छगन भुजबळांचा आवाज रडवेला झाला आणि त्यांना अश्रू आवरता येणं शक्य झालं नाही. त्यांच्या आवाजावरून हे स्पष्ट कळून येत होतं. ते झी २४ तासशी फोनवरून बोलत होते.
हिंदुह्रद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज दुपारी ३.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. बाळासाहेबांच्या निधनामुळे समस्त शिवसैनिक आणि मनसैनिकासह संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगरच कोसळलाय.