www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गावाकडे मतदान केल्यानंतर शाई पुसून मुंबईतही करा मतदान, दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला खरा. मात्र हा सल्ला त्यांच्या अंगाशी आल्यानंतर लगेच सावरासावर केली. दरम्यान टीकेनंतर पवारांनी आपल्या विधानावर सारवासारव केलेय. तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोनदा मतदान करण्याचा सल्ला दिलाय. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. आधी साता-याला मतदान करा नंतर मुंबईत येऊन मतदान करा, असा धक्कादायक सल्ला पवारांनी दिलाय.
बोटाची शाई पुसायला विसरु नका, असंही पवार म्हणाले. एका राजकीय पक्षाचा अध्यक्षच असं बेजबाबदारपणाचं विधान करतो, यावर आश्चर्य व्यक्त होतंय. पवारांच्या या विधानाचं राजकीय क्षेत्रात पडसाद उमटू लागलेत.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडंही तक्रार केलीय. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार याकडं अनेकांचं लक्ष लागलंय.
दोनदा मतदान करण्याच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सारवासारव केलीय. ते विधान मिष्किलपणाने केल्याचं स्पष्टीकरण पवारांनी दिलंय. शरद पवारांनी टिंगलटवाळीमध्ये असं बोललो असं म्हटलं असलं तरी गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अशी विधानं केली जातायत.. यांत गमंत किती आणि तथ्य किती असा प्रश्न त्यामुळं मतदारांच्या मनात निर्माण झालाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.