www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आधीच छापा प्रकरणावरून वादग्रस्त राहीलेले दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती आज पुन्हा नव्या वादात सापडले. मीडियावर मोदींकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. अखेरीस थोड्यावेळानं त्यांना समस्त पत्रकारांची माफी मागावी लागली.
सोमनाथ भारती मीडियानं केलेल्या प्रश्नांवर भडकले. भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी किती पैसे दिले, असा सवाल त्यांनी मीडियाला विचारला. दिल्लीत परदेशी महिलांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीबाबत सोमनाथ भारतींना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर सोमनाथ भारती चांगलेच भडकले. एवढंच नव्हे तर दिल्ली महिला आयोगावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महिला आयोग राजकीय आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा बरखा सिंह काँग्रेसच्या सदस्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारती यांनी केली.
यानंतर मात्र क्षमा मागत माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला, असं म्हणत सोमनाथ भारतींनी आपलं वक्तव्य मागे घेतलं. दक्षिण दिल्लीत मध्यरात्री आफ्रिकन महिलांचा अपमान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. योगगुरू रामदेवबाबांनी अरविंद केजरीवाल यांना सोमनाथ भारतींवर कारवाई करण्याची मागणी केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.