नवी दिल्ली : ३२ वर्ष नौदलात भारताच्या समुद्री सीमांच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडल्यावर आज अखेर आयएनएस गोदावरी ही फ्रीगेट नौदलातून निवृत्त झाली.
भारतीय बनावटीची पहिली युद्धनौका हे आयएनएस गोदावरीचं वैशिष्ट्य. सुर्यास्तासोबतच या जहाजावरील नेव्हीचा ध्वज सन्मानाने खाली उतरवत या जहाजाची निवृत्ती जाहीर करण्यात आली. भारतीय बनावटीच्या जहाजांची सुरूवात गोदावरीपासून झाली. १० डिसेंबर १९८३ मध्ये हे जहाज नौदलाच्या सेवेत रूजू झालंय त्यानंतर विविध मिशन यशस्वीरित्या पूर्ण करत आज या जहाजाने आपला कार्यकाळ पूर्ण केला.
३६०० टन वजन, १२६.४ मीटरची लांबी१४.५ मीटर रूंदी, २ टर्बाईन इंजिन, २७ नॉटीकल मैलांचा स्पीड, डी बँड रडार, हॉल माऊंटेड सोनार सिस्टीम असलेलं भारतीय बनावटीचं हे जहाज नौदलाची ताकद बनलं.. या जहाजावर अत्याधुनिक शस्त्रसामग्री सज्ज होती.
बराक मिसाईल लाँचर सिस्टीम, ४ नौकेवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र, ५७ MMच्या दोन गन, ८५ डिग्रीत फिरणारी 4 एके २३० गन, एन्टी सबमरीन टॉरपेडो हे त्याची ताकद होती. ४० अधिकारी आणि १३ एअर क्रूसह ३१३ जणांचा स्टाफ या फ्रीगेटवर होता.
१९८८ मध्ये ऑपरेशन ज्युपिटर, ऑपरेशन शिल्ड, ऑपरेशन बोल्सटर, त्यानंतर १९९४ मध्ये सोमालियात समुद्री चाचांविरोधातली मोहीम, २००९ आणि २०११ मध्ये गल्फ एडनमध्ये सुरक्षेसाठी गोदावरी सदैव तैनात असे. ऑपरेशन मालदीवमध्ये अवघ्या १२ तासांत जलदगतीने हालचाली करत गोदावरीन मोठा पराक्रम गाजवला होता.