नवी दिल्ली : म्यानमार मोहिमेमुळं तेथिल दहशतवादी खवळले असून सेना आणि भारत सरकारने घडवून आणलेल्या मोहिमेचा बदला घेण्यासाठी भारतात घुसल्याची माहिती एका अहवालातून समोर आलीय.
गुप्तचर संघटनांना याची पक्की खबर मिळाली असून ईशान्येकडील राज्यांना हाय अलर्ट जारी केलाय. सुत्रांच्या माहितीनुसार १५-२० दहशतवादी भारतीय सीमेत घुसले असून संरक्षण विभाग आणि सामान्य नागरिक यांना लक्ष्य बनवण्याची त्यांची मोहिम असल्याचे समोर येतंय. सूत्रांच्या माहितीनुसार काही दहशतवादी संघटनांनी एकत्रीतपणे ही मोहिम आखली असून ते आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत आहेत.
भारतीय सेनेच्या २१ यूनिटच्या जवळपास ७० सैनिकांनी म्यानमार सीमेत घुसून NSCN-K आणि KYKL दहशतवादी संघटनांचे दोन तळ उद्ध्वस्त केले होते. या सैनिकांना म्यानमार सीमेवर हेलीकॉप्टरने सोडले होते. त्यानंतर दोन गटांमध्ये वेगळं होऊन त्यांनी ही मोहिम फत्ते केली होती, ज्यात ३८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यापूर्वी ४ जूनला दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद तर ११ जवान जखमी झाले होते.
दहशतवाद्यांना संपविण्याची मोहिम ४ जूनच्या हल्ल्यानंतर लगेच आखली गेली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल, जनरल सुभाग यांनी यासंबंधी एक बैठक घेतली होती. भारताच्या या मोहिमेकडे दहशतवादाविरोधातील एक महत्त्वाचे पाऊल मानले जातेय. दरम्यान दहशतवाद आणि दहशतवाद्यांना यापुढे कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही असे सरकारने म्हटले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.