नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 1 मे पासून करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीनं आपल्या सरकारी गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला. त्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीही आपल्या गाडीवरचा लाल दिवा काढला.
केंद्रानं लाल दिव्याला तिलांजली दिल्यानंतर राज्यातही हा निर्णय स्वीकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच लाल दिवा वापरणं थांबवलं आहे. त्यांच्या पाठोपाठ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही लाल दिवा काढण्याचे आदेश दिले. त्यामुळं आता राज्यातल्या मंत्र्यांच्या गाड्यांवरही लाल दिवा दिसणार नाही. केंद्र सरकार १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार असलं तरी राज्यात तातडीनं अंमलबजावणी होताना दिसत आहे.