गांधीनगर : गुजरातचे वादग्रस्त निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अखेर गुजरात सरकारने नोकरीवरून हाकालपट्टी केली आहे. संजीव भट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले होते. हे आरोप त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे.
संजीव भट्ट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर दंगलीविषयी अनेक आरोप केले होते. तसेच त्यांचा दंगलीत सहभाग असल्याचा दावा केला होता. यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मात्र आपल्या आरोपांविषयी ते कोणतेही ठोस पुरावे देऊ शकले नव्हते. भट्ट यांची पत्नी नंतर गुजरात विधानसभा निवडणुकीत थेट नरेंद्र मोदी यांच्याच विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यांचा त्या निवडणुकीत नामुष्कीजनक पराभव झाला होता.
संजीव भट्ट यांची बुधवारी हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांना नियमानुसार तुम्ही कामावर हजर राहिले नसल्याचे कारण देण्यात आले आहे. गेल्या 27 वर्षांपासून आयपीएस म्हणून काम केल्यानंतर अखेर सेवेतून हकलण्यात आले आहे. पुन्हा एकदा नोकरीसाठी पात्र ठरावे लागणार आहे, अशी निराशजणक प्रतिक्रिया भट्ट यांनी दिली.
दरम्यान, गुजरात सरकारने सेक्स व्हिडिओ प्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. मात्र, आपण याआधीच नोटीसीचे उत्तर दिले होते, असे संजीव भट्ट यांचे म्हणणे आहे. चित्रफितीत जी व्यक्ती दिसत आहे ती कोणी तरी अन्य व्यक्ती असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
सूत्रानुसार गुजरात सरकारला एक चित्रफित मिळाली आहे, ज्यात संजीव भट्ट एका महिलेसोबत दिसून येत आहेत. गुजरात सरकारने भट्ट यांना या प्रकरणी १० दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. व्हिडिओ क्लिपमधील व्यक्तीच्या चेहऱ्यात आणि आपल्यात मोठे अंतर दिसून येते. मी माझे म्हणणे सिद्ध करण्यासाठी गुजरात किंवा कोणत्याही प्रयोगशाळेत विस्तृत बायॉमेट्रिक चाचणीसाठी तयार असल्याचे भट्ट यांनी आपल्या उत्तरात म्हटले होते. परंतु गुजरातच्या गृहमंत्रालयानुसार हा व्हिडिओ क्लिप खरा आहे आणि यात काहीही काटछाट करण्यात आलेली
नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.