'फेसबूक'वर जोरदार 'शेअर' होतंय, हे मानवतेचं बिल

केरळमधील एका रेस्टॉरंटमधील घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हे रेस्टॉरंटचं बिल हे मल्याळम भाषेत आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 14, 2017, 07:53 PM IST
'फेसबूक'वर जोरदार 'शेअर' होतंय, हे मानवतेचं बिल title=

मल्लापूरम : (शब्दांकन-जयवंत पाटील, झी २४ तास) केरळमधील एका रेस्टॉरंटमधील घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. हे रेस्टॉरंटचं बिल हे मल्याळम भाषेत आहे. ही कहाणी मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्वात महत्वाची मानली जात आहे.

एक छोटीशी कहाणी खूप काही ....

केरळमधील मल्लापुरम भागातील रेस्टॉरंटमध्ये एक जण जेवत होता. बाहेर उभ्या असलेल्या लहानशा भाऊ-बहिणीचे डोळे त्या व्यक्तीच्या जेवणाच्या ताटाकडे भूकेच्या नजरेने पाहत होते. त्या व्यक्तीने इशारा केला, चिमुकल्या भाऊ-बहिणींची नाजूक, पण गरीबीच्या खुणा असलेली पावलं, घाबरत-घाबरत रेस्टॉरंटमध्ये पडली.  

असं होवू शकतं, यावर विश्वास बसणार नाही

जेवत असलेल्या त्या व्यक्तीने काय खायचंय?, असा इशारा केल्यावर, भावा-बहिणीने त्या व्यक्तीच्या ताटाकडे इशारा केला, चिमुकल्यांसाठीही जेवण मागवण्यात आलं. मुलं लहानशा हातात येईल तेवढं, पटापट खात होते, त्यांचं लक्ष फक्त ताटाकडे होतं. भरपेट जेवा, असं सांगण्याचंही काम त्या व्यक्तीला आलं नाही. छोट्याशा निष्पाप पोटातली, भूकेची भीषण आग विझत असावी.

या स्टोरीचा शेवट असा आहे...

मुलांचं जेवण झालं, रेस्टॉरंटच्या काऊंटरवरून बिल आलं, बिल पाहून व्यक्ती चक्रावला, बिलावरचा आकडा कधीही न विसरता येणारा होता, बिलावर लिहिलं होतं...

"आमच्याकडे असं मशीन किंवा आकडा नाहीय, की ज्यात मानवतेची किंमत मोजता येईल, परमेश्वर तुमचं भलं करो..!"

ही कहाणी काल्पनिक असल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं, समजा कहाणी काल्पनिक असली तरी या कहाणीतील, संदेश मात्र कुणीही नाकारू शकत नाही.