वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत असेलेले वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणजे डोनाल्ड ट्रम्प... ट्रम्प यांच्या एका नव्या वक्तव्यामुळे आता वाद निर्माण झालाय. अमेरिकेत गर्भपात बेकायदेशीर केल्यास तो करुन घेणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
'एमएसएनबीसी' या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचे गर्भपातावर काय मत आहे? असा प्रश्न त्यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर नंतर बराच वादंग उठला. यावर स्पष्टीकरण देताना केवळ बेकायदेशीरपणे आणि अवैध ठिकाणी गर्भपात करणाऱ्या महिलांवर कारवाई केली जावी, असे आपण म्हणत असल्याचे ते म्हणाले. यात बेकायदेशीरदृष्ट्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवरही कारवाई केली जावी, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत असलेले अतिउजव्या ख्रिस्ती विचारांचे लोक आजही गर्भपाताच्या विरोधात आहेत. गर्भपात हे पाप असून देवाने देऊ केलेल्या कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही, असे ते मानतात. रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेतील धार्मिक पुराणमतवाद्यांचा पक्ष ओळखला जातो. आजही या पक्षाचे अनेक सदस्य अनेक कठोर मतांचे आहेत.