मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
शरीराने दणकट असलेला परंतु मनाने साधा भोळा असणारा पहिलवान राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली या दोघांच्या प्रेमकथेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. यांच्या प्रेमकथेची सुरुवात, राणाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत, अंजलीला भावलेला त्याचा साधेपणा या सर्व गोष्टींमध्ये प्रेक्षक समरसून गेला आणि आता सर्वांना वेध लागले आहेत ते या दोघांच्या लग्नाचे...
राणाने अंजलीकडे आपलं प्रेम व्यक्त केलं आणि लग्नाची मागणी घातल्यानंतर या गोष्टीने नवं वळण घेतलं आहे. दोघांच्याही घरी लग्नाची तयारी, खरेदीची लगबग सुरु झाली आहे. ही लगीनघाई प्रेक्षकांना सध्याच्या भागांमधून बघायला मिळतेय आणि आता या दोघांचं लग्न बघायला मिळणार आहे दोन तासांच्या विशेष भागामधून... येत्या रविवारी ५ मार्चला सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा विवाह विशेष भाग झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.
गावाकडचं लग्न म्हटलं की रंगरंगोटी, रोषणाई, आतषबाजी, मान मरताब या गोष्टी ओघाने येतातच... आणि सोबत येतो तो त्यावर होणारा भरमसाठ खर्च... सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी लग्न सोहळ्यावर अमाप खर्च करण्याची पद्धत गावांत, शहरांत सगळीकडेच आहे. हा अवाजवी खर्च खरंच एवढा गरजेचा असतो की साधेपणानेसुद्धा लग्नसमारंभ पार पडू शकतात असाच काहीसा संदेश राणा-अंजलीच्या लग्नातून देण्यात येणार आहे. राणाची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांची सधनता, गावात असलेली प्रतिष्ठा हे सगळं मोठं असलं तरी हे लग्न मात्र ते अत्यंत साध्या पद्धतीने लागणार आहे.