मुंबई : अभिनेता शाहरुख खान सध्या एका नव्या वादात अडकलाय. हा वाद निर्माण झालाय एका रॅम्पमुळे. हा एखाद्या फॅशन शोचा रॅम्प नाही. तर शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेरचा हा रॅम्प आहे.
लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार शाहरुख खान. जगभरात त्याचे फॅन्स. सगळ्या जगभरात तो लोकप्रियतेच्या शिखरावर असेलही. पण त्याच्या घराशेजारी राहणारे मात्र शाहरुखला वैतागलेत. आणि त्याला कारण ठरलाय एक रॅम्प.
बांद्र्यातला शाहरुख़ खानच्या मन्नत बंगल्याबाहेर एक रॅम्प अर्थात एक चढाव तयार करण्यात आलाय. इथूनच एक रस्ता माऊंट मेरी चर्चकडे जातो. हा रॅम्प अनधिकृत आहे, त्यावर शाहरुखची व्हॅनिटी व्हॅन उभी असते. त्यामुळे रस्ता ब्लॉक होतो आणि चर्चकडे जाण्यासाठी अडचण येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
वॉचडॉग NGO आणि मन्नतच्या आजुबाजूच्या नागरिकांनी या रॅम्पला विरोध केलाय आणि तो तोडण्याची मागणी केलीय. आतापर्यंत महापालिका हे प्रकरण गांभीर्यानं घेत नव्हती, पण आता वाढता विरोध पाहता, महापालिकेनंही कारवाई करण्याची घोषणा केलीय.
आठ सप्टेंबरपर्यंत मन्नत बाहेरच्या या रॅम्पवर कारवाई झाली नाही, तर प्रकरणाचा सोक्षमोक्ष आपण आपल्या पद्धतीनं लावून टाकू, असा इशारा या परिसरातल्या नागरिकांनी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.