मुंबई : महाराष्ट्रात रोकड जप्तीचं सत्र सुरूच आहे, अमळनेर - चोपडा दरम्यान नाकाबंदीत भरारी पथकाला तपासणीत १ कोटी रूपयांची रोकड मिळाली आहे, ही रोकड टाटा सुमोमध्ये आढळून आली आहे.
ही रोकड जळगाव जनता बँकेची असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र याविषयी खात्री करण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाला बोलावण्यात आलं आहे.
ही रक्कम धुळ्याकडून चोपड्याकडे जाताना पकडण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. या बाबतीत चार जणांची चौकशी सुरु आहे. यासाठी इन्कम टॅक्स विभागाला सुध्दा बोलवण्यात आलं आहे.
नागपूर
नागपूरच्या महाल परिसरात 70 लाख रुपये पकडण्यात आले. स्विफ्ट गाडीत ही रोकड सापडली. याप्रकरणी गाडीच्या चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
खेड टोल नाका
निवडणूक काळात रोकड जप्तीचं सत्र सुरुच आहे. काल रात्री पोलिसांनी खेड टोलनाक्वयावर, भाजप उमेदवार जयसिंग एरंडे यांच्या मुलाच्या गाडीतून 21 लाख रुपये जप्त केलेत.
जयसिंग एरंडे हे पुण्यातल्या आंबेगाव मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आहेत. एरंडे यांचा मुलगा मुंबईवरुन परतत असताना खेडच्या टोलनाक्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोख रक्कमेसह पोलिसांना भाजपचं प्रचारसाहित्यही गाडीत आढळून आलं.
संबंधितांना रक्कमेबाबत विचारपूस केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आलेलं नाही, त्यामुळे सध्या सर्व रोकड जप्त करण्यात आली असून कसून चौकशी सुरु आहे.
दहिसर
दहिसर पश्चिम येथे भाजपच्या उमेदवार मनीषा चौधरींच्या गाडीतून 50 लाखाची कॅश जप्त करण्यात आली. भरारी पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी गाडीचा ड्रायव्हर आणि सहकाऱ्याला पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
पालघर
तिकडे पालघर जिल्ह्यातल्या डहाणूजवळच्या चारोटी नाक्यावर सोळा लाखांची रोकड पकडण्यात आली. ज्या गाडीत ही रोकड साप़डली, त्यात राष्ट्रवादीचे तालुकाअध्यक्ष राजू पारेख यांचे वडील असल्याचं समोर आलं आहे. त्याबाबत चौकशी सुरु आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.