मुंबई: भाजप शिवसेनेपासून दुरावला असला तरी भाजपमुळंच ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी सुरू झाल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या निमित्तानं दिसतंय. शिवसेना आणि मनसेनं भाजपला लक्ष्य करण्याचा एककलमी अजेंडा निवडणूक प्रचारात राबवलाय.
शत्रूचा शत्रू तो मित्र या उक्तीचा आधार शिवसेना-मनसेनं घेतलेला दिसतोय. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुख्य मुद्दा केला असून भाजप आणि मोदींना टार्गेट केलंय. तर एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आता मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय.
मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे? असा सवाल त्यांनी आपल्या सभांमधून केलाय. तसंच राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केलंय.
तर मोदी महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. भाजप आणि मोदीविरोधात दोघांच्या टीकेची धार दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून हेच समान कारण त्यांना एकत्र आणणार की काय अशी चर्चा आता सुरू झालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.