पुणे : शिवसेना – भाजपची गेल्या 25 वर्षांची युती संपुष्टात आल्यानंतर शिवसेना एकाकी पडलीय? अशी चर्चा अनेकदा ऐकायला मिळतेय. पण, यावर पवारांनी गुगली टाकलीय. ‘कोण म्हणतंय शिवसेना एकाकी पडलीय?’ असा प्रश्न पवारांनी उपस्थित केल्यामुळे साहजिकच पवारांच्या डोक्यात काय शिजतंय? असं वळण आता या चर्चेला मिळालंय.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या मृत्यूनंतर शिवसेना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला तोंड देणार आहे. त्यातच भाजपनंही सेनेचा हात सोडलाय... पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले संबंध राजकारणापलिकडचे होते असं सांगणाऱ्या शरद पवारांना ‘बाळासाहेब असते तर शिवसेना अशी एकाकी पडली असती का?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, पवारांनी गुगली टाकत ‘कोण म्हणतंय शिवसेना एकाकी पडलीय?’ असं म्हणत समोरच्याचीच दांडी गूल केली.
पण, पुन्हा स्वत:ला सावरत पवारांनी काही सेकंद थांबून ‘राष्ट्रवादीसुद्धा एकटीच लढतेय... तुम्ही आम्हाला एकाकी का नाही म्हणत’ असा प्रश्न केला खरा... पण, पवारांच्या गुगलीमुळे अनेक शक्यता निर्माण झाल्यात. शेवटी राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नाही आणि कुणीही कुणाचा मित्र नाही हेच खरं...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.