नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या हातात सत्ता द्या. सत्तेत आल्यानंतर केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या देऊ, परप्रांतीयांना एकही नोकरी देणार नाही, एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात येऊ देणार नाही, असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठेवला आहे.
राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबर रोजी घाटकोपर आणि ७ ऑक्टोबर रोजी कालिना येथील जाहीर सभेत परप्रांतीयांना लक्ष्य केले होते. निवडणूक प्रचारादरम्यान राज म्हणालेत, ज्या दिवशी तुम्ही हे राज्य माझ्या हातात द्याल, त्या दिवसापासून राज्यातील कोणताही रोजगार हा मराठी मुला-मुलींनाच दिला जाईल. अन्य राज्यांतील मुला-मुलींना नोकऱ्या दिल्या जाणार नाहीत. त्यांना राज्यात येण्यापासूनच रोखले जाईल, यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. यापुढे सार्वजनिक ठिकाणी बोलताना समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करू नयेत, अशी तंबीही आयोगाने ठाकरे यांना दिली.
आक्षेपार्ह वक्तव्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवीत आयोगाने ठाकरे यांच्याकडून खुलासा मागिला होता. त्यात विविध कायद्यांचे दाखले देत आपण कोणताही आचारसंहिता भंग केला नसल्याचा दावा ठाकरे यांनी आयोगाकडे केला होता. मात्र ठाकरे यांचा हा दावा आयोगाने सपशेल फेटाळून लावला. आपण केलेली वक्तव्ये ही घटनेने दिलेल्या संचार स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी आहेत. परप्रांतीयांना नोकऱ्या न देण्याचे वक्तव्य हे घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरच घाला घालणारे आणि आदर्श आचारंसहितेचाही भंग करणारे आहे. समाजात तणाव वा भेदभाव निर्माण करणारी वक्तव्ये करण्याचा कोणत्याही राजकीय पक्षाला वा उमेदवाराला अधिकार नाही, असे आयोगाने सुनावले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.