कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : अपेक्षे प्रमाणे पिंपरी चिंचवड मध्ये युतीचं घोडं जागा वाटपावर अडकलंच.... १२८ पैकी तब्बल ८८ जागांवर भाजपने दावा ठोकलाय तर शिवसेनेनं निम्म्या म्हणजेच ६४ जागा देण्याची तयारी ठेवलीय.
मुंबई सह राज्यातल्या महानगर पालिकांमध्ये युती संदर्भात सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये ही युती बाबत बोलणी सुरु आहेत... आतापर्यंत केवळ युतीसाठी चर्चा करणाऱ्या दोन्ही पक्षांनी प्रत्यक्ष जागांचे प्रस्ताव ठेवलेत... नव्या प्रस्तावानुसार भाजपने १२८ पैकी ८८ म्हणजेच ७० टक्के जागांवर दावा ठोकलाय. शिवसेनेला ४० जागा देऊ केल्यात... सेनेनं मात्र ६४ जागांचा म्हणजेच ५० टक्के जागांचा प्रस्ताव ठेवलाय, त्यात भाजपने त्यांच्या मित्र पक्षांना जागा त्यांच्याच कोट्यातून द्याव्यात असा ही प्रस्ताव ठेवलाय
मुंबई प्रमाणेच राज्यात प्रत्येक ठिकाणी युतीचं घोडं जागावाटपावरच अडतंय, पिंपरी चिंचवड ही त्याला अपवाद नाही. दोन्ही पक्षाचे नेते युतीला सकारात्मक असल्याचे दावे करतायेत, पण प्रत्यक्षात जागांवर अडून बसलेत... आता पुढच्या चर्चेसाठी दोन्ही पक्ष १९ किंवा २० तारखेला भेटणार आहेत. त्यात काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तूर्तास तरी युतीचं चित्र सध्या तरी धूसरचं आहे...!