राज्यात थंडी वाढली, परभणीत सर्वाधिक कमी तापमान

राज्यात थंडीचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात थंड वारे वाहत आहेत. परभणीत सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर, नाशिक येथे कडाक्याची थंडी पडलेय.

Updated: Dec 26, 2015, 11:11 PM IST
राज्यात थंडी वाढली, परभणीत सर्वाधिक कमी तापमान title=

मुंबई : राज्यात थंडीचा जोर वाढलाय. मुंबईसह राज्यात थंड वारे वाहत आहेत. परभणीत सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर, नाशिक येथे कडाक्याची थंडी पडलेय.

परभणीमध्ये मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली.. परभणीतील तापमान ४ पॉईंट ८ अंशांवर गेलंय. कृषी विद्यापीठातल्या हवामान तज्ज्ञांनी ही माहिती दिलीय. यावर्षी हिवाळा तसा उशिरानंच सुरू झाला. पण गेल्या तीन चार दिवसात खरी थंडी जाणवायला लागलीय. राज्यातला पारा दिवसेंदिवस खाली उतरायला लागलाय. परभणीकरही या थंडीनं गारठून गेलेत.  
 
विदर्भात १० अंशांच्या खाली तापमान
विदर्भातलं जसं उन कडक तशीच इथली थंडीही. याच कडाक्याच्या थंडीचा अनुभव सध्या विदर्भातली जनता घेतेय. पहिल्यांदाच विदर्भातलं तापमान सामान्यापेक्षा ५ अंशाने खाली घसरलंय. गोंदियामध्ये सर्वांधिक कमी म्हणजे किमान ७ पॉईंट ६ तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातलं गेल्या तीन चार दिवसांपासून १० अंशांच्या खाली घसरलंय.  

दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसानं त्यात आणखीन भर टाकलीये ग्रामीण तसंच शहरी भागात सकाळ संध्याकाळ शेकोटीच्या उबेत शेकणारे नागरिक पहायला मिळतात. गोंदिया सोबतच भंडारा आणि पूर्व विदर्भातही नागरीकांना बोच-या थंडीचा सामना करावा लागतोय.. तापमानात आणखीन घट होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.

महाबळेश्वर, नाशकात चांगली थंडी
काश्मीर गोठला असला तरी देशाचं मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात यंदाच्या वर्षी थंडीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येतंय. सध्या महाबळेश्वरच्या तुलनेत नाशिकचं तापमान खूपच खाली गेलंय.

नाशिकची थंडी ही उत्तरेच्या लाटेमुळं असून महाबळेश्वरची थंडी गुलाबी असल्याचं महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर सांगतायत. महाबळेश्वरमध्ये आता जरी थंडी कमी असली तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाबळेश्वरमध्ये दवबिंदू पाहण्यास मिळतील असंही बावळेकर यांनी म्हटलंय.