माथेरान : पर्यटकांचं आवडतं थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये येणा-या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. बंद असणारी माथेरानची टॉय ट्रेन आता लवकरच सुरु होणार आहे.
गेल्यावर्षी एप्रिलमध्ये माथेरान रेल्वेला अपघात झाल्यानंतर माथेरानची रेल्वे सेवा पूर्णपणे रेल्वे प्रशासनानं बंद केली होती. माथेरानची रेल्वेचं बंद असल्यानं त्याचा मोठा त्रास गेली वर्षभर पर्यटक, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना बसतोय.
माथेरान ट्रेन सुरु होण्यासाठी ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणीही केली होती. अनेक आंदोलनं माथेरान रेल्वे विषयी झाली होती. स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनीही याचा पाठपुरावा केला होता.
अखेर माथेरान रेल्वे लवकरच धावणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अमन लॉज ते माथेरान यादरम्यान नादुरुस्त रेल्वे मार्ग अपघातविरहित तयार केलाय. येत्या १ जूनपासून अमन लॉज स्टेशन ते माथेरान अशी शटल सेवा सुरु होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिलीय.