शशिकांत पाटील, लातूर : जिल्ह्यातल्या चार नगरपालिकांपैकी निलंगा नगरपालिकेचा रणसंग्राम चांगलाच रंगणार अशी चिन्ह आहेत.
लातूर जिल्ह्यातल्या चार नगरपालिका निवडणुकांपैकी लक्षवेधी नगरपालिका राहणार आहे ती निलंग्याची... राज्याचे कामगार-कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा हा मतदारसंघ... मात्र, सध्या निलंगा नगरपालिकेवर सत्ता आहे ती काँग्रेसची... मंत्रीमहोदयांचे सख्खे आजोबा तसंच माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं या पालिकेवर वर्चस्व आहे. त्यामुळे याठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे.
निवडणुका आल्या की नेहमी निलंगेकर आजोबा-नातू किंवा काका-पुतण्या असं चित्र काँग्रेस-भाजप कडून रंगवलं जातं. मात्र या दोघांच्या कामाला निलंग्याची जनता वैतागलीय. त्यामुळे संभाजी पाटील निलंगेकर यांच्या बिनविरोधचा प्रस्ताव अमान्य करत जनतेनं विकासासाठी आपल्या पारड्यात मतदान करावं असं आवाहन शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय.
जनतेतून नगराध्यक्ष निवडून द्यायचा असल्यामुळे सर्वच क्षेत्रात सरस असणारा उमेदवार देण्याचा राजकीय पक्षांचा कल असणार आहे. पाणी, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, पथदिवे या आणि अशा अनेक समस्या निलंगा नगरपालिकेत सध्या दिसून येत आहेत. त्यामुळे निलंग्यातील सुज्ञ मतदार कुणाच्या पाठिशी राहणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.