नागपूर : येथील सेमिनरी हील परिसरात मानवसेवा नगरात झाकण नसलेल्या गटारात पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय. नागपूर सुधार प्रन्यास बांधत असलेल्या एका बगीच्यात सायकल चालवताना तो या खड्ड्यात पडला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बगीच्याचं काम करणा-या ठेकेदारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.
या महिन्याच्या नऊ तारखेला गोंदिया जिल्ह्याच्या राका गावात झाकण नसलेल्या बोअरवेलमध्ये पडल्याने एका ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. ५ दिवसांनंतर विवेक दोनाडे नावाच्या त्या चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही घटना ताजी असतानाच नागपूर जिल्ह्यातील इसासनी गावात गटार साफ करणाऱ्या चौघांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला.
या पाठोपाठ नागपुरात आणखी एक दुर्दैवी घटना घडलीय. १२ फूट खोल गटारात पडून एका ८ वर्षांच्या बालकाचा बळी गेलाय. गुरफान अली अकबर असं या मुलाचं नाव आहे. गेल्या अऩेक वर्षांपासून मानवसेवा नगरात बगीच्याचं काम सुरू आहे. या बगीच्याच्या बांधकामात समतल असलेल्या गटाराच्या टाकीवर झाकण नव्हतं. त्यात पडून त्या मुलाचा मृत्यू झाला.
गेल्या अनेक वर्षांपासून इथे या बगीच्याचं बांधकाम केलं जातंय. ठेकेदाराच्या मनात येईल तेव्हा बगीच्याचं काम केलं जातं. कुठलीही सुरक्षा भिंत नसलेल्या या बगीच्यात अशा झाकण नसलेल्या २ टाक्या आहेत. त्यामुळे नेहमीच इथे खेळणाऱ्या मुलांचा जीव धोक्यात असतो. अशा प्रकारे कामं होत असतील तर कंत्राटदारांवर प्रशासनाचं नियंत्रण असतं की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहेत.