बुलडाणा : आपण पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून लोकांना फसविणारी टोळी आज मेहकर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ५ आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांच्याजवळून ६० लाख रुपयांच्या नकली नोटा देखील जप्त केल्या आहेत.
पैशांचा पाऊस पाडून तुमचे पैसे दुप्पट-तिप्पट करून देतो असे सांगून लोकांची फसवणूक करणारी टोळी गेल्या काही दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय होती. ही टोळी लोणार येथे येणार असून याठिकाणी ते पैशाचा पाऊस पाडणार आहे, अशी गोपनीय माहिती बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शर्मा यांना मिळाली.
त्यानुसार त्यांनी सापळा रचला. सोहेल शर्मा यांनी लोणार शहरालगत असलेल्या एका शेतात थांबलेल्या या टोळीकडे दोन आरसीएफ जवानांना ग्राहक म्हणून पाठविले. त्याठिकाणी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी पूजाअर्चा सुरु झाली. त्यावेळी सोहेल शर्मा यांनी छापा टाकून या टोळीला रंगेहात पकडले.
यावेळी त्यातील एका व्यक्तीने त्याच्याजवळ असलेले कोब्रा नाग सोहेल शर्मा आणि त्याच्या टीमवर फेकला आणि तेथून तिघांनी पोबारा केला. त्यातील एका आरोपीला तेथेच पकडले तर दोघांना सिनेमास्टाईल चार किलोमीटर त्यांच्या मागे धावत पकडले.
याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याजवळून ६७ हजार रुपयांच्या असली तर १००० हजाराचे ४० बंडल. ५०० रुपयाचे ४० बंडल असे ६० लाख रुपयाच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे काही औषधी, पूजेचे सामान, लिंबू, साप असे साहित्य देखील जप्त केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.