पुणे: निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीचे बिगुल वाजायला सुरुवात झालीय. पुण्यात शिवाजीनगरमध्ये विद्यमान आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी काँग्रेसमधले निष्ठावंत एकवटले आहेत. निम्हणांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात बंडखोरी करणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिलाय.
शिवाजीनगर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. विद्यमान आमदार विनायक निम्हण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा इतके दिवस होती. पण निम्हण काँग्रेसचेच असून येत्या निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेत. याठिकाणी आपल्या विरोधात लढत देऊ शकेल, असा तुल्यबळ उमेदवार कुणाकडेच नसल्याचा निम्हणांचा दावा आहे.
विनायक निम्हण यांच्या या दाव्याला त्यांच्याच पक्षातून आव्हान उभं राहिलंय. विनायक निम्हण हे मुळातच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले आहेत. तसंच त्यांची प्रतिमा अनेक कारणांनी डागाळलेली आहे, असं असताना त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी निष्ठावंतांनी केलीय. यासंदर्भात माजी आमदार चंद्रकांत छाजेड, स्थानिक नगरसेवक दत्तात्रय बहिरट तसंच माजी महापौर दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच एक बैठकही झाली.
आघाडीचं घोडं सध्या जागावाटपावर अडलंय. त्यामुळं उमेदवार याद्या रखडल्या आहेत. लवकरच हा घोळ संपेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. मात्र पक्षात असो वा आघाडीत, बंडखोरीचा ताप कायम राहणार आहे. पुण्यातलं शिवाजीनगर ही त्याचीच नांदी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.