रत्नागिरी : चिपळूणमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान आज प्रचंड गोंधळ झाला. आज हिंदीचा पेपर होता. आलोरे आणि युनायटेड स्कूल या दोन केंद्रांवर साडेचारशे प्रश्नपत्रिका कमी पडल्या. त्यामुळे फोटोकॉपी काढण्याची वेळ आली.
मात्र फोटोकॉपी काढण्यासाठी आणि त्यातही परवानगी देण्यास तब्बल एक तास लागला. पोलीस बंदोबस्तात फोटोकॉपी काढण्यात आल्यामुळे त्यातही खूप वेळ गेला. त्यामुळे ११.०० वाजता सुरू होणारा पेपर १.०० वाजता सुरू झाला. हे दोन तास विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलमध्येच बसून राहावं लागलं. परिणामी ३ तासांच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना तब्बल ५ तास एकाच जागी बसावं लागलं. यामुळे पालक संतप्त झाले असून दोषी अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी केली.
मात्र बोर्डाचे अधिकारी याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत. पेपर छापणाऱ्या गोपनीय प्रेसची चूक असल्याचा दावा कोकण बोर्डाचे सचिव रमेश गिरी यांनी केलाय. जबाबदार असलेल्यांना दंड आकारण्यात येईल, असंही त्यांचं म्हणणं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.