सूर पिंपरी : आत्महत्याग्रस्त शेतकरीच्या कुटुंबीयांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार होते. तसे नियोजित दौऱ्यात होते. मात्र, गावात जाऊनही त्यांनी भेट घेण्याचे टाळले. त्यामुळे नाराज ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. काल ते परभणीमध्ये होते. सूर पिंपरी गावातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना ते भेट देणार होते. त्यांच्या नियोजित कार्यक्रमात तसा उल्लेखही होता. मात्र गावाच्या शिवारात येऊनदेखील फडणवीस या कुटुंबाला भेटले नाहीत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री येणार म्हणून शासकीय यंत्रणाही जोरदार कामाला लागल्या होत्या. खराब रस्ते दुरूस्त झाले, सगळीकडे कडेकोट बंदोबस्त होता. गावकरीही दिवाळी असल्यासारखे नवीन पोशाख परिधान करुन तयार होते. मुख्यमंत्री गावाजवळ आले आणि एका विहिरीचं उद्घाटन करून परत गेले.
दोनशे मीटरवर असलेल्या गावात ते आलेच नाहीत. मुख्यमंत्री यवतमाळहून हिंगोलीमार्गे न येता दोनशे किलो मीटरचा वळसा घेऊन ल्याहरीला माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा सत्कार स्वीकारण्यास जाऊ शकतात, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असं चित्र यामुळे उभं राहिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.