काँग्रेसकडे बघा, इतरांकडे नको- राहुल गांधी

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींचं आज दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यासाठी मुंबईत आगमन झालं. राहुल यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीबाबतच्या तक्रारीवर दिले उत्तर देताना राहुल म्हणाले, आपल्या पक्षाकडे बघा दुसऱ्यांकडे नको.

Updated: Apr 27, 2012, 05:32 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

उत्तरप्रदेशच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांप्रमाणे 2014च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे युवराज राहुल गांधी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींचं आज दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यासाठी मुंबईत आगमन झालं. मुंबईत आगमन झाल्यानंतर त्यांनी भाईदास हॉलमध्ये जाऊन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

 

यावेळी 2014 मध्ये राहुल महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सूतोवाच केलं. शिवाय काँग्रेस पदाधिका-यांशी राहुल यांनी चर्चा केली. राहुल यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राष्ट्रवादीबाबतच्या तक्रारीवर दिले उत्तर देताना राहुल म्हणाले, आपल्या पक्षाकडे बघा दुसऱ्यांकडे नको.

 

काँग्रेस कार्यकर्त्यांना धडे दिल्यानंतर राहुल यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. चैत्यभूमीकडून य़ुवराजांचा ताफा काँग्रेसचं मुख्यालय टिळक भवनात पोहचला. टिळक भवनात येणारे गांधी कुटुंबातले ते पहिले सदस्य आहेत. या ठिकाणी त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. टिळक भवनातून राहुल गांधी माटुंग्यात पोहचले. याठिकाणी त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राहुल यांनी त्यांची मतं आणि समस्या जाणून घेतल्या.

 

राहुल गांधींसमोर कामगारांची निदर्शनं

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरुन गिरणी कामगारांनी आज राहुल गांधी यांच्यासमोर निदर्शने करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेतलं. काँग्रेसचं मुख्यालय असलेल्या टिळकभवन इथं राहूल गांधी यांचा कार्यक्रम सुरु असताना कामगारांनी निदर्शने केली. राज्य सरकारनं गिरणी कामगारांना साडे सात लाख रुपयांना घरे देण्याची घोषणा केलीये. मात्र कामगारांनी मोफत घरांची मागणी केलीये. मागच्या आठवड्यात गिरणी कामगारांनी टिळकभवनावर मोर्चा काढला  होता.